बेळगाव / प्रतिनिधी 

कोरे गल्ली शहापूर येथील कॉर्नर जवळील कमान ध्वजासहित पडली असताना आनंदवाडी येथील श्री खर्डेकर या बालकाने भर पावसात धाव घेत भगवा ध्वज हाती घेत सुरक्षित ठेवला. या बालकावर झालेले संस्कार, ध्वजावरील प्रेम तसेच ध्वजाबद्दल असलेला अभिमान हे कौतुकास्पद आहे. त्यानिमित्ताने आनंदवाडीतील सर्व महिलांच्या वतीने श्री याला चांदीची चैन शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गल्लीतील सर्व महिला युवक मंडळ व बाल चमूकले हे सर्व उपस्थित होते. 

त्याचबरोबर समाजसेवक वैभव खाडे यांनी श्री या बालकाचा दोन वर्षाचा शाळेचा खर्च आपण स्वतः देऊ असे यावेळी सांगितले. यानंतर समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी जनतेला आवाहन करताना श्री हा एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. तीन महिन्यापूर्वीच श्री च्या वडिलांचे निधन झाले. आई घर काम करून मुलांचा सांभाळ करते. श्री चे कुटुंब भाडोत्री घरामध्ये वास्तव्यास आहेत त्याकरिता ध्वजाचा अभिमान आणि ध्वजाचे संरक्षण करणाऱ्या श्री ला दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे अशी विनंती केली.