- जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली असून आरपीडी कॉलेजमध्ये स्ट्रॉंग रूम करून मतमोजणीची व्यवस्था केल्याची माहिती जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी बेळगावात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी ते पुढे म्हणाले येत्या बुधवारी १० मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होऊन सायंकाळी ६ वाजता मतदान संपेल. मतदान सुरु होण्यापूर्वी ९० मिनिटे आधि सर्व मतदान केंद्रांवर मतदानाचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल. त्यानंतर बरोबर ७ वाजता मतदानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बेळगाव जिल्ह्यात ८० वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी घरबसल्या मतदान योजना राबविण्यात आली, त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानास येताना मतदान ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. परंतु ओळखपत्र उपलध नसल्यास आधारकार्ड, नरेगा कार्ड, फोटोसह बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसेन्स, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, पॅन कार्ड, अपंग प्रमाणपत्र अशा फोटोसह असलेली ओळखपत्र दाखवून मतदान करण्यास मुभा असल्याचे ते म्हणाले. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालये आदी आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. पावसाची शक्यता गृहीत धरून ताडपत्री व आवश्यक साहित्याचा पुरवठा केंद्रांना करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उद्या सकाळी पोलीस तुकड्या नियोजित मतदान केंद्रांवर रवाना होणार असून शहर पोलिसांसह निमलष्करी पोलीस, केएसआरपी, डीएआर पोलीस आणि होमगार्ड्स तैनात केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागरी, राखीव, निमलष्करी, गोवा असे एकूण ९ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी जिल्हाभरात तैनात करण्यात आले महत्वाच्या गावात, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांनी निवडणूक काळात आजवर मतदारांना वाटण्यासाठी योग्य कागद्पत्राअभावी नेण्यात येत असलेली एकूण ९ कोटी २४ लाख रुपये रोख रक्कम विविध चेकपोस्टवर जप्त केली आहे. त्यापैकी सुमारे ६ कोटी रक्कम पुढील तपास आणि चौकशीसाठी प्राप्ती कर खात्याकडे पाठविण्यात आली असून उरलेली ३. ५ कोटी रक्कमेची चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. एकंदरीत यंदाची विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करून बेळगाव जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे सज्ज आहे.
0 Comments