निपाणी / वार्ताहर 

भरधाव डंपरची सायकलला धडक बसून झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गळतगा (ता. निपाणी जि. बेळगाव) येथे आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तन्मयी लोकेश सुर्वे (वय १०) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, तन्मयी (भीमनगर गळतगा) गावातील दुकानातून  सायकल घेऊन परतत होती. याचवेळी गळतगा गावातून खडकलाटकडे खडीभरून निघालेल्या डंपरने सायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती  की, यामध्ये डंपरच्या चाकाखाली सापडून तन्मयीचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच चालक डंपर सोडून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस उपनिरीक्षक भारतेश गौडा यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत डंपर ताब्यात घेतला. तसेच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून पोलीस फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत.