बेळगाव / प्रतिनिधी
दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील हेरवाडकर हायस्कूलसमोर गॅरेज शेजारी पार्क केलेल्या एका मारुती व्हॅनसह दोन कार गाड्यांना आग लागून मोठे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेरवाडकर हायस्कूल समोर रस्त्यापलीकडे असलेल्या गॅरेज शेजारी एका मारुती व्हॅनसह दोन कार गाड्या पार्क करण्यात आल्या आहेत. या गाड्यांना आज शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत तीनही वाहने आगीत जळून भस्मसात झाली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेची टिळकवाडी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
0 Comments