खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्याच्या जांबोटी नजीक हब्बनहट्टी येथे गुरे चरावयास गेलेल्या एका महिलेवर झुडपात लपून बसलेल्या दोन अस्वलांनी हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. रेणुका इराप्पा नाईक (वय ६०, रा. हब्बनहट्टी ता. खानापूर) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार,रेणुका ही आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेताकडे चरण्यासाठी सोडलेली स्वतःची गुरे आणण्यासाठी नाल्याच्या ठिकाणी गेली असता, तेथे दबा धरून बसलेल्या दोन अस्वलांनी अचानक तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात तिच्या कपाळ आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा करतात तिचा पती व इतर शेतकरी मदतीला धावून आले. त्यांनी लाठ्या-काठ्यांनी व दगडांनी मारून अस्वलांना पिटाळून लावत महिलेची त्यांच्या तावडीतून सुटका केली. यावेळी जखमी अवस्थेतील रक्तबंबाळ झालेल्या महिलेला उपचारासाठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या जखमी महिलेला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
0 Comments