बेळगाव / प्रतिनिधी 

"नजर से नजर मिला के देखो,दिल की बात बता के तो देखो" अशी सुरुवात करीत सौ.चित्रा क्षीरसागरजीनी आपल्या टीमसह कविता व सुत्रसंचलनाद्वारे काव्य संध्या रंगतदार केली.गुरुवार दि. 25 मे 2023रोजी लोकमान्य ग्रंथालयात हा कार्यक्रम झाला. लोकमान्य ग्रंथालय, शब्द गंध कवी मंडळ,वाङमय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय,राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्याहून आलेल्या सात कविंनी  कवितांचा कार्यक्रम सादर केला.

प्रारंभी श्री.जगदीश कुंटेनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक अलगोंडीनी स्वागत भाषण केले .सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी कवींचे पुष्प व पुस्तक देउन स्वागत केले.

प्रा.अंजली चितळे, श्रीमती आसावरी कुळकर्णी, श्रीमती रजनी रायकर, शर्मिला प्रभू, चित्रा क्षीरसागर,श्री.मोहनराव कुळकर्णी आणि श्री.प्रकाश क्षीरसागर यांनी गोव्याच्या मातीशी, संस्कृतीशी आणि सद्य परिस्थिती संबंधी सुंदर कविता सादर केल्या. देवभुमी गोवा म्हणजे सन,सैंड व केवळ बिचीस नाही तर आम्ही सह्याद्रीची पोरं व बरंच काही हे त्यांनी कवितांतून मांडलं.

म्हादई,मांडवी,लईराईदेवी,म्हार्दोळ,मंगेशी,धोंड,सुशेगात, सुरमई आमटी,आंबा,काजू, नारळ,फणस,बांगडे,माटोळी अशी गोमंतकीय खास आठवण करुन दिली. आताशा पोरी भूतकाळात रमत नाहीत, भातुकली खेळत नाहीत, भविष्याचा वेध घेत,वर्तमानावर स्वार होतात,अशा शब्दांत सांगता करण्यात आली. कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला.सर्व कविंनी सर्व संस्थांचे व बेळगावकरांचे आभार मानले.सर्व कवी हे स्वतः उद्योजक अथवा चांगल्या पदांवर काम करीत असून, अनुभवी व अनेक पुस्तकांचे कवी-लेखक आहेत.