• विजयपूर जिल्ह्याच्या तंगडगी राज्य महामार्गावरील घटना 
  • ट्रकसह चालक मुद्देबिहाळ पोलिसांच्या ताब्यात 

विजयपूर / वार्ताहर 

भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक बसून झालेल्या दोन जागीच ठार , तिघेजण गंभीर जखमी झाले तर दुसऱ्या  दुचाकीवरील चालकही गंभीर जखमी झाला आहे. विजयपूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ शहराबाहेरील तंगडगी राज्य महामार्गावर गुरुवारी रात्री ९.३० वा. सुमारास हा अपघात झाला. शरणम्मा कांबळी (वय ५५ ) आणि नागेश शिवापुर (वय ३५ रा. मुदनाळ ता. मुद्देबिहाळ जि.विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर कृतिका (वय १०) व भूमिका (वय ८) आणि मुद्देबिहाळ येथील मुत्थूठ फायनान्सचा कर्मचारी सुधीर बेनाळ अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या सर्व जखमींवर स्थानिक शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेले शरणम्मा कांबळी आणि नागेश शिवापुर यांचे सासू आणि जावई असे नाते होते. तर गंभीर जखमी झालेल्या कृतिका आणि भूमिका या शरणम्मा यांच्या नाती आणि नागेश यांच्या कन्या होत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मृतांच्या शरीरावरील मांस व अवयव रस्त्यावर विखुरले गेले होते. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार मुद्देबिहाळ शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर मिनी भाजीपाला मार्केटमध्ये शरणम्मा व नागेश (सासूआणि जावई) भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. रात्री काम आटोपल्यानंतर ते आपल्या मुलांसह गावी परतताना हा अपघात झाला. अपघातानंतर चालक ट्रक सहचालक फरार झाला होता. मात्र अपघाताची माहिती मिळताच मुद्देबिहाळ पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून नेबगिरी गावानजीक चालकासह ट्रक ताब्यात घेतला. अपघातानंतर स्थानिकांनी १०८ क्रमांकशी संपर्क साधून रुग्णवाहिकेला पाचारण केले. माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेहांचे छिन्नविछिन्न भाग पिशव्यांमध्ये भरून उत्तरीय तपासणीसाठी मुद्देबिहाळच्या शासकीय रुग्णालयात नेले. या घटनेची नोंद मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.