- म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केला विश्वास
- मतदानानंतर मानले जनतेचे आभार
सुळगा (हिं.) / वार्ताहर
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान झाले. गेल्या महिनाभर निवडणुकीसाठी काम करत असताना ग्रामीण भागातील जेष्ठ नेते, म. ए. समितीचे कार्यकर्ते, युवावर्ग, महिलावर्ग या सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करून मतदानाचा पवित्र हक्क बजविला. याबद्दल बेळगाव ग्रामीण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर.एम.चौगुले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील जनतेचे आभार मानले. यावेळी ते पुढे म्हणाले, मतदानाचा हक्क बजाविताना सीमाभागावर झालेला अन्याय, अत्याचार, या गोष्टींचा विचार करून मतदारांनी अतिशय ताकदीनिशी उत्साहाने मतदान केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळी ७ वाजल्यापासून बेळगाव ग्रामीणच्या विभागावर गावोगावी जाऊन भेटी दिल्या असता त्याठिकाणची गर्दी आणि मराठी समाजाचा उत्साह बघितला तर यावेळी समाज म. ए. समितीला विजय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेली कित्येक वर्षे याठिकाणी आम्हाला लोकप्रतिनिधी नाही. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मराठी भाषिकांवर झालेला अन्याय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, मराठी फलक, कन्नड सक्ती यासारख्या विविध विषयांवरती झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी मराठा समाज आज सज्ज झाला होता आणि खरोखरचं त्या उत्साहाने मराठी भाषिकांनी आपला बाणा याठिकाणी दाखवून दिलेला आहे असे ते म्हणाले. गत निवडणुकीपूर्वी मतदानाचा ७५ ते ८० टक्क्यांचा उच्चांकही मतदारांनी मोडीत काढला असून यावेळी ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत काही गावांनी मतदान केलेले आहे. म्हणून नक्कीच यावेळेला म. ए. समितीचे उमेदवार विजयी होतील आणि विशेषतः ग्रामीण मतदार संघातील समितीचा वरचष्मा कायमचा राहिल. येत्या १३ तारखेला हा अंदाज दिलेला कौल सर्वांना पाहायला मिळेल आणि आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 Comments