• कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतमोजणी
  • उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद 
  • आरपीडी कॉलेजमध्ये स्ट्रॉंगरूम ; संपूर्ण परिसर सीलबंद

बेळगाव / प्रतिनिधी 

राज्यासह बेळगाव जिल्ह्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरळीत पार पडले. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ७६.७० टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजता मतदानाची वेळ संपत आली, तरी गर्दीमुळे अनेक मतदान केंद्रांवर वेळेवर येऊनही अनेकजण मतदानाचा हक्क बजाविण्यापासून वंचित होते. त्यामुळे रांगेतील मतदारांना टोकन देऊन उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. 

मतदान झाल्यावर ठरविक वेळेत पोलीस संरक्षणात जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रातून रात्री उशिरापर्यंत मतपेट्या कडेकोट बंदोबस्तात बेळगावच्या आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये आणण्यात आल्या. जिल्हाधिकारी व मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूम सील करण्यात आली.

याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना  मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघात काल मतदान सुरळीतपणे  पार पडले. त्यानंतर सर्व १८ निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये आणल्या. आज पहाटेपर्यंत ही पक्रिया सुरु होती. आज सर्व उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्षांचे एजंट यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात येणार आहे. ईव्हीएम क्लिअर केल्या जातील. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुन्हा एकदा निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मतमोजणीच्या पूर्व तयारीबद्दल माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी  शनिवारी सकाळी ८ वाजता आरपीडी महाविद्यालयाच्या स्ट्रॉंगरूममधून मतपेट्या बाहेर काढून मतमोजणीला सुरुवात होईल. प्रारंभी  बॅलेट्सची मोजणी करण्यात येईल. सर्व १८ मतदारसंघांसाठी प्रत्येकी २ टेबल्स अशी एकूण ३६ टेबल्स मांडून मतमोजणी करण्यात येईल. त्यानंतर जसजशी मतमोजणी पूर्ण होईल तसतसे निकाल जाहीर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वप्रथम करण्यात येईल. त्यासाठी २ टेबल्स निश्चित केले आहेत. शनिवारी मतमोजणीदिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत येणारी पोस्टल मते मोजणीसाठी स्वीकारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर मतमोजणीसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने जय्य्तत तयारी केल्याचे पाहायला मिळते.