• जानेवारी ते एप्रिल दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३,९५६ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य परिवहनच्या वायव्य विभागाने जानेवारी ते एप्रिल या कालावधीत परिवहन बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३,९५६ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून १३.२४ लाखांचा दंड वसूल केला आहे. परिवहनच्या वायव्य विभागाचे जनसंपर्क अधिकारी एच. रामगौडा  यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले, धारवाड, बागलकोट, बेळगाव, गदग, हावेरी आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांतील ५५ आगारांमधून ४४४५ बसेस धावत आहेत. यामधून नियमित १६ ते १७ लाख प्रवासी  प्रवास करतात.

या पार्श्‍वभूमीवर परिवहनच्या महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय व संबंधित विभाग स्तरावर तपास पथकांचे काम तीव्र करण्यात आले असून, या पथकांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ७१,०२१ बसेसची तपासणी केली. या तपासणीत एकूण १३,९५६ प्रवासी विनातिकीट अनधिकृत प्रवास करताना आढळून आले. अशा प्रवाशांकडून  १३,२४,२४५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार, अधिकृत तिकीटाशिवाय परिवहन बसमधून प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यासाठी प्रवास शुल्काच्या दहापट किंवा पाचशे रुपयांपर्यंतचा दंड जागेवरच भरावा लागेल. आणि इतर प्रवाशांसमोर अपमान आणि लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी तिकीट काढावे आणि न चुकता प्रवास करावा, अशी विनंती त्यांनी केली.