बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मराठी मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध केल्या असून युवा समितीच्या पाठपुराव्याने हे यश आले आहे. उपलब्ध  करून देण्यात आलेल्या मराठी मतदार याद्यात बऱ्याच मतदारांच्या आणि गावाच्या नावांमध्ये चुका आढळून आल्या असून त्या दुरुस्ती संदर्भात निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचे युवा समितीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केली होती. परंतु सदर यादी मराठी भाषेत उपलब्ध नव्हती. त्यामुळे ८ जानेवारीला म. ए. युवा समितीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार  दाखल करताच प्रशासनाने मराठी भाषेत याद्या उपलब्ध करून दिल्या होत्या. पण त्या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केल्या नाही. त्यामुळे दि. ९ मार्च २०२३ रोजी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केले होते. प्रत्येक मराठी भाषिकांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपले नाव तपासून पाहण्यास शक्य होत नाही. 

ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून सांगली जत मध्ये कानडी भाषिक बहुसंख्य असलेल्या भागात कन्नड भाषेत मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध केल्या जातात त्याच पद्धतीने बेळगावात देखील मराठी याद्या ऑनलाईन उपलब्ध कराव्यात अशी मागणी निवेदनद्वारे केली होती.