• सुदैवाने दोघे बचावले 
  • पोहायला गेले असता घडली दुर्घटना 

गोकाक / वार्ताहर 

पोहायला गेलेल्या चार तरुणांचा घटप्रभा नदीत बुडून मृत्यू झाला. धुपदाळ (ता. गोकाक जि. बेळगाव) येथे घटप्रभा पोलिस स्थानकाच्या हद्दीत आज शुक्रवारी दुपारी २.१५ वा. सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

संतोष बाबू इटगी (१८), अजय बाबू जोरे (१८), कृष्णा बाबू जोरे (२२) आणि आनंद कोकरे (१९) चौघेही (रा. हिरीगेरे ता. मुंडगोड जि. उत्तर कन्नड) अशी मृतांची नावे आहेत. तर या घटनेत  सुदैवाने बचावलेल्या विठ्ठल जानू कोकरे (वय १९) रामचंद्र कोकरे  (वय १९) यांच्यावर घटप्रभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती नुसार हे सर्व तरुण घटप्रभा येथील एका बारमध्ये काम करत होते. आंबेडकर जयंतीनिमित्त बार बंद असल्याने हे तरुण धुपदाळनजीक घटप्रभा नदीत पोहायला गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज j करण्यात येत आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन चारही मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद घटप्रभा पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.