•  धारवाड -रामनगर राज्य महामार्गावर गोधोळी गावच्या हद्दीतील घटना 
  • आ.अंजली निंबाळकर यांच्याकडून जखमींची चौकशी तर मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन 

खानापूर / प्रतिनिधी 

अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात गोधोळी (ता. खानापूर) येथील तीन शेतकरी ठार तर एकाचा उपचारादरम्यान केएलई रुग्णालयात मृत्यू झाला. गोधोळी गावच्या हद्दीत धारवाड रामनगर राज्य महामार्गावर  गुरुवारी मध्यरात्री नंतरही घटना घडली. महाबळेश्वर शिंदे (वय ६५), पुंडलिक रेडेकर (वय ७२ रा. गोधोळी) आणि पुंडलिकचा मोठा भाऊ कृष्णा रेडेकर (वय ७४) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत कृष्णा रेडेकर यांचा केएलई रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी मंजुनाथ कागीनाक (वय ४७) यांना किरकोळ दुखापत झाल्याने ते बचावले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार गोधोळीचे चार शेतकरी  शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी निघाले होते. यावेळी गावच्या शिवारात पायी चालत  जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनांने त्यांना जोराची धडक दिली. यावेळी दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला होता. अपघाताचे वृत्त समजतात माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच खानापूर शासकीय रुग्णालया जाऊन मृतदेहाचे विच्छेदन करण्यात मदत केली.

दरम्यान आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जखमींची व मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस करत सांत्वन केले.