(फोटो आणि व्हिडिओ सौजन्य निलेश मोरे)

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव तालुक्यातून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर.एम.चौगुले यांचा तालुक्यातील बाकनूर, इ. बडस, कावळेवाडी, बिजगर्णी आज जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी सदर गावातून आर.एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.

प्रारंभी  सकाळी ठीक ७ वा. बाकनूर येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन केल्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

बाकनूर गावातील गल्लोगल्ली प्रचार फेरी काढून मराठी भाषा, सीमाप्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचे यांनाच आगामी निवडणुकीत मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी आर. एम. चौगुले यांचे गल्लोगल्ली औक्षण करून स्वागत करण्यात आले. तालुक्यात विकासाची गंगा नव्याने प्रवाहित करण्यासाठी या निवडणुकीत आर. एम. चौगुले प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

यानंतर इनाम बडस, बेळवट्टी, कावळेवाडी, बिजगर्णी गावांमध्येही  गल्लोगल्ली प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीलाही लक्षणीय  प्रतिसाद लाभला.

शेवटी बिजगर्णी ब्रम्हलिंग मंदिर येथे सभा घेऊन या प्रचाराची सांगता करण्यात आली. या प्रचार फेरीसाठी  आर. एम. चौगुले यांच्यासमवेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.