- म. ए. समितीचे आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- समितीला पाठिंबा देण्यासाठी लोटला मराठी भाषिकांचा जनसागर
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी अफाट मराठी भाषिकांच्या साक्षीने आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी म. ए. समिती आणि आर. एम. चौगुले यांना पाठबळ देण्यासाठी शहरात एकवटलेल्या मराठी भाषिकांचा जनसागर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल अशा पद्धतीचा होता.
प्रारंभी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत धर्मवीर संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून बैलगाडीतून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुढे कॉलेज रोड, राणी चन्नम्मा चौक मार्गे मिरवणूक तहसीलदार कार्यालयाकडे रवाना झाली. यावेळी भगवे फेटे आणि टोप्या परिधान केलेले म. ए. समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वत्र फडकणाऱ्या भगव्या झेंड्यांमुळे शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. ढोल ताशांचा दणदणाट, मराठी अस्मिता अन् बेळगाव कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, येऊन येऊन येणार कोण समिती शिवाय आहे कोण? अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत बैलगाडीतून काढलेल्या मिरवणुकीमुळे मराठी भाषिकांच्या एकीची वज्रमूठ दिसून आली.
बैलगाडीत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्यासह मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्यासह उत्तर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अमर येळळूरकर उभे होते. अबाल वृद्धांसह महिलांनीही यावेळी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी गेल्या ६५ वर्षांपासून बेळगावसह सीमा भागातील ८६५ खेडी महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी म. ए. समिती लढा देत आहे. बेळगाव मराठी भाषिकांचेच आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. यामुळे निवडणुकीतील विजयानंतर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी एक भक्कम पुरावा आम्ही देणार आहोत. सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी मराठी भाषिकांनी या लढ्याला बळकटी देऊन बेळगाव दक्षिण, उत्तर ग्रामीण यासह खानापूर आणि यमकनमर्डी मतदार संघातून निवडणूक रिंगणात असलेल्या म. ए समितीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले.
एकंदरीत आर. एम. चौगुले यांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित मराठी भाषिकांचा उत्साह पाहता, कोणत्याही स्थितीत ही निवडणूक जिंकायचा निर्धार समिती नेते, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनीही केल्याचे दिसून आले. यात त्यांना कितपत यश येते हे येणाऱ्या काळातचं पहावे लागेल.
0 Comments