बेळगाव / प्रतिनिधी

कोल्हापूरच्या धरतीवर बेळगावच्या सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार योजना बेळगाव महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली होती. दरम्यान चांगल्या योजनेचे योग्य नियोजनच नसल्यामुळे बेळगाव सुरू करण्यात आलेली मोफत अंत्यसंस्कार योजना बारगळलेली पाहायला मिळत आहे.त्यातच बेळगावच्या नागरिकांमध्ये अद्यापही गोवर्यां ऐवजी लाकडांवरच अंत्यसंस्कार करण्याचा कल दिसून येत आहे.
कोल्हापूरच्या धरतीवर बेळगावातील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. सदर योजनेचे काम सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्याकडे सोपविण्यात आले.सुरेंद्र अनगोळकर यांनी सर्वप्रथम शहराच्या सदाशिव नगर स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार सुरू केले.मात्र या ठिकाणी गोवऱ्या ठेवण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे गोवऱ्या साठविण्यासाठी मोठी अडचण होत आहे. दुसऱ्या बाजूला शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत सदर योजना सुरू करण्यात आली. मात्र या ठिकाणी गोवऱ्यांवरील अंत्यसंस्काराला नागरिकांकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेनेही सदर योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु बऱ्याच वेळा आर्थिक दुर्बल कुटुंबातील लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी गोवऱ्यांची आवश्यकता लागते.मोफत अंत्यसंस्काराची विचारणा केली जाते. त्यावेळी मोठी अडचण निर्माण होत आहे.
सदर योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात 50 लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे सांगितले गेले.अंत्यसंस्कारासाठी किमान अडीच ते पाच क्विंटल लाकूड लागत असे. गोवऱ्यांवरील अंत्यसंस्कारांसाठी 400 शेणाच्या गोवऱ्या तर एक क्विंटल लाकूड लागत होत्या. मोफत अंत्यसंस्काराची योजना कोल्हापुरात गेल्या कित्येक वर्षांपासून निरंतर सुरू आहे.मात्र स्मार्ट सिटी म्हणून घेणाऱ्या बेळगाव महापालिकेला काम सहा महिने ही व्यवस्थितरित्या करता आलेले नाही. त्याचबरोबर मोफत अंत्यसंस्कारासाठी राखून ठेवण्यात आलेला राखीव निधीचा उपयोग, कुठे केला जात आहे. याबाबतही आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.