कल्लेहोळ / गोपाळ पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून म. ए. समितीच्या उमेदवारीसाठी  युवा नेते आर. एम. चौगुले यांचे नाव चर्चेत आहे. या निवडणुकीत समितीने  युवा नेतृत्व आणि नवोदित उमेदवाराला संधी दिल्यास ते नक्कीच संधीचे सोने करतील आणि निवडणुकीनंतर ग्रामीण मतदारसंघाचा भावी आमदार समितीचाच असेल अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनमताचा विचार करता समितीकडून युवा नेते आर. एम. चौगुले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून  बेळगाव ग्रामीण मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी महापौर शिवाजी सुंठकर (कणबर्गी), आर. एम. चौगुले (मण्णूर), रामचंद्र मोदगेकर (निलजी), आर.आय.पाटील (कंग्राळी खुर्द) आणि ॲड.सुधीर चव्हाण (कंग्राळी बुद्रुक) यांनी तालुका समितीकडे  अर्ज दाखल केले होते. त्यानुसार रविवारी पाचही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून ग्रामीण मतदारसंघातील जनमत जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून मराठा मंदिर येथे निवड कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका समितीने १३१ जणांची निवड कमिटी तयार केली आहे.

निवड कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वांची मते जाणून घेऊन त्याच दिवशी उमेदवाराची निवड होणार आहे.  ग्रामीण मतदारसंघात एकच उमेदवार दिला जाणार असून अर्ज भरलेल्या इच्छुक उमेदवारांनी देखील समिती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहून समितीचा विजय निश्चित करण्याचा निर्धार केला आहे.