बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध रक्कम आणि मद्य वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही विविध ठिकाणी ही वाहतूक सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शनिवार दि. ८ ते मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी विविध तपासणी नाक्यांवर पोलिस आणि अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांविना नेण्यात येत असलेली रोख रक्कम याशिवाय दागिने आणि मद्यसाठा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे.
-सदलगा -दत्तवाड चेकपोस्टवर ५० लाखांची रोख रक्कम जप्त -
बेळगाव जिल्ह्यातील सदलगा दत्तवाड चेकपोस्टवर आज कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवैधरित्या वाहतूक केली जाणारी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव या सीमावर्ती जिल्ह्यात चेकपोस्टवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आज एफएसटी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली आहे.
-कोगनोळी चेकपोस्टवर शनिवारी २ लाख ५० हजार जप्त -
कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर २ लाख ५० हजार रु. आढळण्याची घटना शनिवार दि. १० रोजी रात्री ८ वा. सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर मुंबईहून बेंगळूर कडे जात असणाऱ्या खाजगी चार चाकी गाडीची तपासणी केली. गाडीतील गोकुळदास पांडुरंग प्रभू यांच्याकडे २ लाख ५० हजार रु. असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ रोख रक्कम ताब्यात घेऊन पंचनामा केला.निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, रमेश पवार आदींसह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
- कोगनोळी तपासणी नाक्यावर रविवारी ५ लाख ९६ हजारांची रक्कम जप्त-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी तपासणी नाक्यावर वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. रविवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास ५ लाख ९६ हजारांची रक्कम आढळून आली. या रकमेबाबत कोणतीच कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी ती जप्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील नाना पेठ मधील रहिवासी मोहम्मद मुशाहिद शेख (वय ४३) हे आपल्या कारमधून गडहिंग्लजकडे निघाले होते. कोगनोळी तपासणी नाक्यावर आल्यानंतर निवडणूक अधिकारी व पोलिसांनी त्यांच्या कारची झडती घेतली. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना कारमध्ये ५ लाख ९६ हजारांची रक्कम आढळून आली. अधिकाऱ्यांनी शेख यांच्याकडे रकमेचा तपशील मागितला. पण त्यांना योग्य कागदपत्रे देता आली नाहीत. केवळ कामगारांचा पगार भागविण्यासाठी जात असल्याचे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी वरील सर्व रक्कम जप्त केली. कोगनोळी येथील पीडीओ आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी शेख यांच्याविरुद्ध येथील ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
-हुन्नूर चेकपोस्टवर एकूण २.१० कोटी रुपयांची कागदपत्र नसलेली रक्कम जप्त -
जमखंडी विधानसभा मतदारसंघांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या हुन्नूर चेकपोस्टवर एकूण २. १० कोटी रुपयांची कागदपत्र नसलेली रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पी. सुनील कुमार यांनी दिली आहे. जमखंडी येथील हुन्नूर चेकपोस्टवर अधिकारी तपासणी करत असताना एक संशयास्पद वाहन थांबवून तपासणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. सापडलेले पैसे सौहार्द बँकेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी दिलेल्या नोंदी परिपूर्ण नाहीत. त्यामुळे दस्तऐवज देण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे. सध्या ही रक्कम जप्त करण्यात आली असून ती निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जमखंडी येथील शासकीय तिजोरीत जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
कागदोपत्री नसलेल्या रोकडचा पंचनामा करून जिल्हास्तरीय रक्कम जप्त मदत समितीकडे अहवाल सादर केला आहे. समिती याकडे लक्ष देऊन कारवाई करेल. चेकपोस्टवर मिळालेल्या पैशाचा मालक हा फ्रेंडली क्रेडिट कोऑपरेटिव्ह लिमिटेडचा आहे. हिप्परगी, सत्ती, अथणी, बनहट्टी, रबकवी आणि विविध शाखांमध्ये पैसे पाठवत असल्याची तोंडी माहिती त्यांनी दिली आहे.चेकपोस्टवर तपासणी करताना विहित नमुन्यातील कागदपत्रे नसल्यामुळे व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा अवैध वाहतुकीसाठी वापर केल्याचा संशय आल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
-कित्तूर चेकपोस्टवर ४.१५ लाखाचे सोन्या -चांदीचे दागिने जप्त-
रविवारी कित्तूर चेक पोस्टवर एका कारमधून ४ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच दागिने वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक कार ही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कित्तूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी केली जात आहे. कित्तूर चेक पोस्टवर एक कार रोखून झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी कारमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. दागिन्यांबाबत संबंधितांकडे विचारपूस करण्यात आली. तसेच दागिन्यान संदर्भातील कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने निवडणूक अधिकारी व पोलिसांनी ४ लाख १५ हजार रुपये किंमतीचे सोन्या - चांदीचे दागिने आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली.
-गोकाक येथे ३.५ लाखाचा मद्यसाठा जप्त-
गोकाक येथे साडेतीन लाख रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत ६५६ लि. मद्याचे सुमारे ७६ बॉक्स जप्त करण्यात आले. रविवारी सायंकाळी ७.२५ वा. गोकाक अबकारी निरीक्षक उपनिरीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार धाड घालून ही कारवाई करण्यात आली.
0 Comments