बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते रमाकांत कोंडुसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शनिवार दि. १५  एप्रिल रोजी रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ८७ सदस्यांची निवड कमिटी नियुक्त करण्यात आली होती. दक्षिण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातून वल्लभ गुणाजी यांनी रमाकांत दादा कोंडुसकर यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला तसेच माजी आमदार मनोहर किणेकर, आप्पासाहेब गुरव, ॲड. रतन मासेकर, नगरसेवक रवी साळुंखे  यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

तत्पूर्वी रमाकांत दादा कोंडुसकर, ॲड. रतन मासेकर, शुभम शेळके, रवी साळुंखे आदींसह जनमताचा कौल घेण्यात आला. दक्षिण मतदार संघातील जनमत विचारात घेत श्री रमाकांत दादा कोंडुसकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

हिंदुत्ववादी विचारसरणीचे रमाकांत दादा कोंडुसकर हे कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. युवा वर्गांमध्ये रमाकांत दादा कोंडुस्कर यांच्या बद्दल एक आदराचे स्थान आहे. त्यांच्या पाठीशी युवा कार्यकर्त्यांची संघटना आहे. रमाकांत दादा कोंडुसकर हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असतात. त्याचप्रमाणे श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केलेली आहे. रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण मतदार संघामध्ये विशेषतः तरुण वर्गांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.