बेंगळूर / वार्ताहर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डी. बी. इनामदार (वय ७४) यांचे रात्री उशिरा बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
फुफ्फुसाच्या समस्येने त्रस्त असलेल्या डी. बी. इनामदार यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बेंगळूर येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान काल रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
इनामदार यांनी १९८३ मध्ये जनता पक्षाकडून बेळगावातील कित्तूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि प्रथमच विजयी झाले. १९९४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आतापर्यंत ९ निवडणुकांना सामोरे गेलेले इनामदार १९८३, १९८५ मध्ये जनता पक्षाकडून १९९४, १९९९, २०१३ मध्ये काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते. १९८९, २००४, २००४ आणि २०१८ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत डी. देवराज अर्स, एस.एम. कृष्णा, एस. बंगारप्पा सरकारमध्ये ते मंत्री होते.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत डी. बी. इनामदार हे कित्तूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे काँग्रेसने त्यांच्या ऐवजी बाबासाहेब पाटील यांना तिकीट दिले.
0 Comments