- जयंत पाटील यांचे आवाहन
- आप्पाचीवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा
कागल / प्रतिनिधी
निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निपाणीतील मतदारांनी नव्या चेहऱ्याला संधी देणे गरजेचे आहे. उत्तम पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे सरळ मार्गी नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात नवा विचार पेरला जात आहे. त्यामुळे उत्तम पाटील हेच निवडून येतील व कर्नाटकात राष्ट्रवादीचे नेतृत्व करतील, असा विश्वास महाराष्ट्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आप्पाचीवाडी येथे युवा नेते व राष्ट्रवादीचे उमेदवार उतम पाटील यांच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुभाष जोशी, राजू आवळे, नावेद मुश्रीफ, अभिनंदन पाटील, मदनराव कारंडे, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, अशोककुमार असोदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, उत्तम पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. सामान्य कार्यकर्त्याचे काम दिल्लीपर्यंत पोहोचत नाही हाच काँग्रेसमध्ये दोष आहे. पण राष्ट्रवादीने नेहमीच नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी उत्तम पाटील यांना तिकीट देऊन निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादीची पायाभरणी केली आहे. निपाणी मतदारसंघात जातीच राजकारण होईल पणं आपण जातीपेक्षा गुणवत्तेला महत्व दिलं पाहिजे. लोकशाही वाचवायची असेल तर भाजपचे सरकार घालवणे गरजेचे आहे.
उतम पाटील यांनी समाजकार्यातून स्वतःची ओळख सिद्ध केली आहे. आता फक्त या नव्या चेहऱ्याला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. उत्तम पाटील निवडून आल्यानंतर कर्नाटक विधानसभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व तर करतीलच पण आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर कर्नाटकातील एक मोठे नेतृत्व बनेल असेही ते म्हणाले.
यावेळी उत्तम पाटील म्हणाले की, आमचे वडील सहकारत्न रावसाहेब दादा पाटील यांनी पन्नास वर्षे सामाजिक सेवा केली. 70 टक्के समाजकारण व 30 टक्के राजकारण या तत्त्वांवरच आम्हाला राजकारणात प्रवेश करण्यास परवानगी दिली. नैसर्गिक आपत्तीसह समाजात उद्भवलेल्या प्रत्येक संकटावेळी आमच्या परीने आम्ही कार्य केले आहे. आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिसादावर यंदाची निवडणूक लढवत आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली असून ही उमेदवारी सिद्ध करण्यासाठी सर्व मतदारांनी आपल्याला मतदान करावे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा. सुभाष जोशी सर, के डी पाटील, अनिता पठाडे, दिपाली गिरी , राजू खिचडे, राजनंदिनी पाटील, विलास गाडीवडर, अशोककुमार असुदे, माजी आमदार राजू आवळे नावेद मुश्रीफ यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
बाळासाहेब देसाई सरकार यांनी स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, धनश्री पाटील, विनयश्री पाटील, तात्या नाईक, आदित्य यड्रावकर, जयवंत कांबळे, आनंद गिंडे, रमेश भिवसे, सुनील पाटील, अमोल देसाई, प्रा. सचिन खोत यांच्यासह मान्यवर व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments