• गळफास घेऊन संपविले जीवन 

बेळगाव / प्रतिनिधी 

कडोली (ता. बेळगाव) येथे कर्जाला कंटाळून पेंटरने दारूच्या नशेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बिराप्पा केंपाण्णा पुजारी (वय ४२, मूळचा बुगडीकट्टी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर  सध्या रा. रामनगर गल्ली कडोली) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी व एकुलता एक मुलगा असा परिवार आहे. 

याबबाबत प्राप्त माहितीनुसार तो सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये सेक्युरिटी व  शिपाई  तसेच बाहेर  पेंटिंग काम करायचा. कर्जबाजारी झाल्यामुळे मानसिक नैराश्यातून दारूच्या नशेत त्याने अंबराईतील सरकारी कन्नड हायस्कूलजवळ गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे उघड झाले. मंगळवारी रात्री ११ नंतर पुजारी बेपत्ता झाला होता. शुक्रवारी दुपारी १ वा. च्या सुमारास आंब्याच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेला आढळून आला. माजी महापौर यल्लाप्पा कुरबर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष राजु मायाण्णा, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष दत्ता सुतार, माजी ग्रा. पं. सदस्य गजानन कागणिकर, काकती पोलीस स्टेशनचे पीएसआय चन्नबसप्पा, हवालदार विजय दोडमनी, लतीफ मुशापुरी व पत्नी कल्पना पुजारी आदींच्या उपस्थित पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी  जिल्हा रुग्णालयाकडे  पाठविण्यात आला. यानंतर  त्याच्यावर  मुळगावी  अर्थात  बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.