बेळगाव / प्रतिनिधी 

आज 8 मार्च जागतिक महिला दिन. यानिमित्त बेळगाव जिल्हा महिला परिषदेच्या वतीने महिलांच्या समस्यांबाबत एल्गार पुकारण्यात आला. शहरातील राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर काही वेळ निदर्शने करण्यात आली.

यावेळी  प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा महिला परिषदेच्या नेत्या मंगल शंकर जाधव म्हणाल्या , बेळगाव शहरात आणि जिल्ह्यात तसेच देशातील एकंदर महिलांना दररोज वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी महिला दिनानिमित्त आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. देशात जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

त्यामुळे सरकारने वाढती महागाई तत्काळ कमी करून महिलांना दिलासा द्यावा. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाई उग्र रूप धारण करत आहे. 15 दिवसांपूर्वी शहरात पाण्यासाठी एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी आहे. 10-15 दिवसांतून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. आम्ही किती म्हणून आणि कसे पाणी साठवून ठेवायचे असा सवाल करून किमान 1-2 दिवसाआड पाणी पुरविण्याची मागणी त्यांनी केली. अनेक कायदे करूनही महिलांवरील अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे अत्यंत कठोर कायदे आणि शासन करून महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालावा अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी निदर्शक महिलांनी, वाढती महागाई कमी करा, दारूबंदी झालीच पाहिजे, सुरळीत पाणी पुरवठा झालाच पाहिजे, बेळगाव जिल्हा महिला परिषदेचा विजय असो आदी घोषणा दिल्या. मंदा नेवगिरी यांच्यासह अनेक महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.