बेळगाव / प्रतिनिधी 

धुलीवंदन दिवशी रंगपंचमी झाल्यानंतर मित्रांसह धरणावर आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

अविनाश अरविंद देवलेकर (वय २२, रा. सिद्धेश्वर गल्ली पिरनवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील धरणात बुडून या युवकाचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अविनाश मंगळवारी दुपारी रंगपंचमी झाल्यावर आंघोळ करण्यासाठी धरणावर गेला होता. यावेळी दुर्दैवाने तो पाण्यात बुडाला. अविनाश हा विज्ञान शाखेचा पदवीधर होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.

मंगळवारी दुपारी धरणात बुडाल्यानंतर  सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आला त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.