सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेळगाव शहर आणि उपनगरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी बेळगाव तालुक्यासह शहराच्या दक्षिण भागात रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत महिलांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग उधळण्यास प्रारंभ झाला. शहरात विशेषत: वडगाव, शहापूर भागात संस्थान कालीन परंपरेप्रमाणे आज रंगपंचमी साजरी करण्यात आली.
तरुणाई आणि बालचमू डॉल्बीच्या तालावर थिरकत होते. अनेक ठिकाणी रंगपंचमीसाठी खास वॉटर शॉवर लावण्यात आले होते. शहापूर कचेरी गल्ली, नार्वेकर गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, नवी गल्ली, गणपत गल्ली येथे रंगपंचमीचा उत्साह दिसून आला.
धुलीवंदना दिवशी काही गावात रंगपंचमी साजरी करण्यात आली. मात्र ग्रामीण भागामध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी तालुक्यातील अनेक गावे रंगात रंगून गेली होती. सकाळपासूनच ठिकठिकाणी लहान मुलांचा आणि तरुणांचा रेन डान्स पाहायला मिळाला.
आयुष्यातील दुःख विसरून सर्वजण सप्तरंगाप्रमाणे आपले आयुष्य रंगीत बनवताना दिसत होते. जल्लोषी वातावरणात एकमेकांना भेटून गल्लीमध्ये कोपऱ्यावर, चौकात, गावाच्या वेशीत रंग उधळण्यात आले.
सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत डीजेच्या तालावर जल्लोष रंगला होता. विशेषत: तरुण-तरुणींनी यावेळी नृत्याची मजा घेतली.
0 Comments