• टेलिकॉम कंपन्यांकडून खोदकाम
  • प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

बेळगाव / प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघात विकास कामांचा झपाटा सुरू केला आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातही मूलभूत सुविधांतर्गत नव्याने रस्ते उभारणी व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत शहरातील खडक गल्ली, काकती वेस, भडकल गल्ली  या परिसरातील रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. वास्तविक विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी हा जनतेकडून कर स्वरूपात वसूल केला जातो. ही वस्तुस्थिती असताना नागरिकांची गैरसोय होते त्या ठिकाणी रस्ता कामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र कार्यकर्ते राहत असलेल्या परिसरातील रस्त्यांची नव्याने उभारणी तसेच डांबरीकरण करून त्यांना खुश करण्याचा आटापिटा स्थानिक लोकप्रतिनिधींनी चालविला आहे.

खडक गल्ली, काकतीवेस, भडकल गल्ली या परिसरात  टेलिफोन विभागाच्या काही कंपन्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळेस रस्त्यांचे खोदकाम करण्यास  प्रारंभ केला. यावेळी या भागातील काही जागृत युवक व महिलांनी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराला जाब विचारून काम थांबवण्यासाठी  आग्रह धरला. या भागातील काही कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदारांना दूरध्वनीवरून या प्रकाराची माहिती दिली. तसेच  नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याची तक्रार केली. या प्रकारानंतर स्थानिक आमदारांनी टेलिकॉम कंपन्यांना काम बंद करण्याची सूचना केली.आमदारांच्या सूचनेनंतर काही काळासाठी काम बंद करण्यात आले. यानंतर कार्यकर्तेही माघारी फिरले. 

मात्र काही वेळातच रस्त्याच्या खोद कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. यामुळेच अशा कामात अधिकारी, लोक प्रतिनिधी यांची हात मिळवणी असल्याने दुर्लक्ष केले जाते. मात्र याचा  फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो, अशा शब्दात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तेव्हा कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्या परिसरातील रस्त्यांचे काम न करता शहरात ज्या ज्या ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत त्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी अथवा नव्याने रस्ते करण्यात यावेत, अन्यथा  रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.