बेळगाव / प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून आज शनिवारी सकाळी पक्षाकडून सचिव मुकुल वासनिक यांनी १२४ उमेदवारांची  पहिली यादी जाहिर केली. या यादीत बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी ९ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाने केली आहे. यात बेळगाव जिल्ह्यात पाच विद्यमान आमदार, तीन माजी आमदार आणि एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.

जाहीर उमेदवारीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार कनकपुरा तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वरूणा मतदार संघातून निवडणुक लढविणार आहेत. त्याचप्रमाणे  बेळगाव ग्रामीणमधून विद्यमान आ. लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरमधून  विद्यमान आ. डॉ. अंजली निंबाळकर, यमकनमर्डीमधून विद्यमान आ. सतीश जारकीहोळी, चिक्कोडीतून विद्यमान आ. गणेश हुक्केरी, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलागी यांनी तिकीट जाहीर केले आहे. पहिल्या यादीत हुक्केरी मतदारसंघात माजी आमदार ए. बी. पाटील, कागवाडचे माजी आमदार राजू कागे, रामदुर्गचे माजी आमदार अशोक पट्टण यांना उमेदवारी दिल्याची घोषणा करण्यात आली आहे. कुडची मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली असून  महेंद्र तम्मन्नावर यांना उमेदवारी  जाहीर करण्यात आली आहे.

             -विजयपूर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार व एक माजी आमदारास उमेदवारी-

            

विजयपूर / दिपक शिंत्रे 

बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातून काॅंग्रेस पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. एम. बी. पाटील, बसवनबागेवाडी मतदारसंघातून शिवानंद पाटील, इंडी मतदारसंघातून यशवंतरायगौडा पाटील या विद्यमान आमदारांसह मुद्धेबिहाळ मतदारसंघातून माजी आमदार सी.एस.नाडगौडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विजयपूर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ असून 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तीन, भाजपाचे तीन तर, दोन जागेवर निधर्मी जनता दलाचे उमेदवार विजयी झाले होते.

सिंदगी विधानसभा मतदारसंघातून निधर्मी जनता दलाचे आमदार एम. सी. मनगोळी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार रमेश भोसनूर विजयी झाले होते.

विजयपूर शहर, सिंदगी, देवरहिप्परगी व राखीव नागठाण विधानसभा मतदारसंघातून काॅंग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. या पैकी तीन मतदारसंघात भाजपचे आमदार असून, नागठाण राखीव मतदारसंघ निधर्मी जनता दलाकडे आहे.