- हजारो शिवभक्तांची होती उपस्थिती
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी राजहंसगडावर उभारलेल्या सर्वात उंच शिवमूर्तीवरून राजकारण केले. मराठी भाषिकांच्या मते मिळविण्यासाठी रंगलेल्या श्रेयवादातून दि. २ मार्च रोजी भाजप तर दि. ५ मार्च रोजी काँग्रेसतर्फे या मूर्तीचे तब्बल दोनदा अनावरण करण्यात आले. अशाप्रकारे एकाच मूर्तीचे दोनदा अनावरण झाल्याने शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज हजारो शिवभक्तांनी शिवमूर्तीचे जलाभिषेक व दुग्धाभिषेक, विधिवत पूजन करून शुद्धीकरण केले. यावेळी म. ए. समितीशी एकनिष्ठ राहून आदेश पाळण्याची शपथ शिवरायांना स्मरून घेण्यात आली.
यासाठी गेल्या 15-20 दिवसांपासून समितीने जनजागृती केली होती. त्याला प्रतिसाद देत बेळगाव शहर, तालुका, खानापूर, निपाणीसह जिल्ह्यातून आलेल्या हजारो शिवभक्त कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गडाजवळील सिद्धेश्वर मंदिरात पूजा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली. झांजपथक, ढोल-ताशांच्या दणदणाटात उत्साहाने सळसळणाऱ्या हजारो युवकांनी मिरवणूक आणि शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळ्यात जल्लोषाने सहभाग घेतला. यावेळी शिवमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मार्कंडेय, मलप्रभा, घटप्रभा, कृष्णा आणि पंचगंगा या पंचनद्यांचे जल आणि सोहळ्यासाठी खास आणलेल्या गंगाजलापासून शिवमूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. सोहळ्यासाठी खास रायगडावरून पाचारण केलेल्या पुरोहितांनी धार्मिक विधींचे पौराहित्य केले. भगवे फेटे, टोप्या परिधान केलेले शिवभक्त आणि सर्वत्र डौलाने फडकणार भगवे ध्वज यामुळे चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, शिवमूर्तीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक घातल्यानंतर उपस्थित लोकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यासाठी विविध गावच्या लोकांनी यथाशक्ती मदत करून छ.शिवाजी महाराजांवरील प्रेमाचे दर्शन घडविले.कार्यक्रमास हजारो मराठी भाषिक शिवभक्त भगवे फेटे, भगव्या टोप्या घालून उपस्थित होते. गडावर ठिकठिकाणी भगवे झेंडे डौलाने फडकत होते. त्यामुळे राजहंस गडाने भगवे रूप धारण केल्याचे सुंदर दृश्य पहायला मिळाले.
0 Comments