खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील असोगा रामलिंग देवस्थान वर  प्रशासक नेमण्यासाठी खटाटोप सुरू होता. मात्र त्या विरोधात रामलिंग देवस्थानच्या ट्रस्टींनी धारवाड येथील खंडपीठाकडे मनाई साठी दावा दाखल केला होता. त्यानुसार सुनावणी होऊन न्यायालयाने प्रशासक नेमणुकीला स्थगिती दिली आहे. यामुळे रामलिंग देवस्थानच्या ट्रस्टींना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा धर्मादायखात्याच्या वतीने कमिटी नेमून त्यानंतर विविध मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. एक प्रकारे मंदिराच्या ट्रस्टींना नाहक त्रास देण्याचाच हा प्रयत्न असल्याचा आरोग्य केला तर विविध देवस्थानांच्या ट्रस्टींकडून केला जात आहे. मुळात धर्मादाय खात्याच्या वतीने नेमण्यात आलेली जिल्हा धर्मादाय समितीच बेकायदेशीर असल्याचे काही जणांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी उपस्थित नसताना जिल्हा धर्मादाय समितीची नियुक्ती करण्यात आल्याने प्रत्येक ठिकाणी आव्हान दिले जात आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य मंदिरांचा कारभार त्याच्या मंदिरांच्या जीर्णोद्धार कमिटीकडे किंवा ट्रस्टींकडे सोपविलेला असतो. मात्र त्या ठिकाणी धर्मादाय खातेचा प्रशासक नेमून गैरप्रकार करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले. खानापूर येथील रामलिंग देवस्थान वरही प्रशासक नेमण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्या विरोधात उच्च न्यायालय धारवाड खंडपीठाकडे स्थगिती मागण्यात आली होती. तेथे स्थगिती मिळाली आहे. या मंदिराच्या ट्रस्टींच्या वतीने ॲड. सुनील देसाई, ॲड. पी.जी.भाटे यांनी काम पाहिले.