- सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव / प्रतिनिधी
रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका गरीब महिलेच्या घराला आग लागून गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ही महिला मोठ्या अडचणीत आली आहे. झेरे गल्ली अनगोळ आज बुधवारी सकाळी ही घटना घडली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील साहित्य बेचिराख झाल्याने महिलेचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच पाण्याची फवारणी करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत घरातील संसारोपयोगी जळून भस्मसात झाले होते.
या घटनेनंतर युवा भाजप नेते किरण जाधव आणि म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी लागलीच त्या नुकसानग्रस्त महिलेची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी आगीमुळे झालेल्या घराच्या नुकसानीची दुरुस्ती करून देण्याचे तर किरण जाधव यांनी तिला गृहपयोगी साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र या घटनेनंतर बेघर झालेली ती दुर्बल महिला आणि तिच्या मुलींची सध्या तात्पुरती सोय करून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. घराला आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळून देखील तलाठी आणि तहसीलदारांपैकी कोणीही उशिरापर्यंत पंचनाम्यासाठी न आल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
0 Comments