बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्याच्या बागेवाडीनजीक गद्दकरविनकोप्प गावातील शेतात पांढऱ्या रंगाचा एक विचित्र फुगा आढळल्याने  ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली होती. या फुग्यामध्ये  इलेक्ट्रॉनिक मशीन असल्याने  खळबळ उडाली होती. हा गुप्तहेर खात्याचा फुगा (बलून) असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती.

सदर बाब गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पाहणीनंतर हे एक हवामान संशोधनातील तापमान पाहण्यासाठी वापरण्यात आलेले उपकरण असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.संजीव पाटील यांनी केले आहे.

हा फुगा शेतात आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली होती. यानंतर बैलहोंगल पोलीस  आणि जिल्हा पोलीस प्रमुखही घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी सदर उपकरण हवामानातील आर्द्रता, वाऱ्याचा वेग तपासण्यासाठी वापरण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले. ज्यांनी हा बोलून हवेत सोडला आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी चिंता करू नये असे सांगण्यात आले आहे.