- राजहंसगडाच्या विकासासाठी अतिरिक्त ५ कोटी अनुदान
- मुख्यमंत्री बसवराज बोम्माई
बेळगाव / प्रतिनिधी
देशाचे अद्वितीय नेते आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शौर्याने लढा दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करताना आनंद होत आहे. राजहंसगडाच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
गुरुवारी (२ मार्च) रोजी जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती विभाग, केआरआयडीएल, पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजहंसगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करताना ते बोलत होते.
या अनुदानाचा उपयोग राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी कम्युनिटी हॉल, विश्रामगृह व इतर मूलभूत सुविधा बांधून पर्यटन स्थळात रूपांतरित करण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किल्ले विकासासाठी अनुदान वितरित करणे
२००८ मध्ये मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राजहंसगडाच्या विकासासाठी १४ कोटी रुपये मंजूर केले. जनार्दन रेड्डी त्यावेळी पर्यटन खात्याचे मंत्री होते. आमदार संजय पाटील यांच्या प्रयत्नातून परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान जाहीर करण्यात आले. किल्ल्याच्या विकासासाठी आधीच राखून ठेवलेल्या अनुदाना व्यतिरिक्त ५ कोटींचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राजहंसगड हा अप्रतिम किल्ला आहे. शिवाजी महाराजांचे गतवैभव आणि संस्कृती जपणारा हा किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वानुसार मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आगामी काळात गडाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्म रक्षणासाठी लढलेले शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. या देशाने पाहिलेला तो सर्वात महान नेता आहे. मुघल आणि परकीयांच्या राजवटीत त्यांनी हिंदू साम्राज्य निर्माण करण्यासाठी मुघलांच्या महान साम्राज्याशी लढा दिला. आई जिजाबाई यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारचे शिक्षण व कला शिकवणारे शिवाजी महाराज हे महान नेते होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून नगारा वाजून कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके, बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील, प्रादेशिक आयुक्त एम.जी. हिरेमठ, कन्नड सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री उपस्थित होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वागत केले. विनायक मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाडगीत सादर केले. बसवराज कुप्पासगौड यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण करून आभार मानले. कार्यक्रमात राजहंस गड ग्रामस्थांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
0 Comments