बेळगाव / प्रतिनिधी 

शेट्टी गल्ली (बेळगाव) येथील परशराम छात्रू किल्लेकर यांच्या मालकीच्या कौलारू घराला आज सकाळी ११.३० वा. सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.  या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, शैक्षणिक व महत्वाची कागदपत्रे यासह अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या घटनेत सुदैवाने कोणतीही  जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.  

दरम्यान, उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज सकाळी ११.४५ वा. घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पीडित कुटुंबाना शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बेळगावचे तहसीलदारही उपस्थित होते त्यांनी आगीच्या घटनेची माहिती घेऊन शासनाच्या वतीने मदतीसाठी सर्व प्रयत्न करू असे आश्वासन दिले.यावेळी स्थानिक नगरसेवक मुझमिल ढोणी, शकील मुल्ला यांच्यासह सरकारी अधिकारी उपस्थित होते.