बेळगाव / प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्याचे दर निश्चित करून ते निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहेत. आचारसंहिता लागू असताना या दरांच्या आधारे प्रचाराचा खर्च काढला जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक-2023 च्या प्रचार साहित्याच्या किंमतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
काही साहित्याचे दर किंवा किंमत निर्धारित दरापेक्षा कमी असल्यास संबंधितांनी सादर केलेल्या पावतीचा नियमानुसार विचार करण्याची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आचारसंहिता लागू असताना, प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्याची यादी केली जाईल आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बाजारभाव निश्चित केला जाईल. प्रचारादरम्यान त्यांचा वापर केला जाईल, तेव्हाच त्यांचा निवडणूक खर्चात समावेश केला जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या किमती आणि दर्जाच्या आधारे काही साहित्याच्या किमती कमी करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी, जिल्हा पंचायत मुख्य लेखापाल तथा निवडणूक खर्च नोडल अधिकारी परशुराम दुडगुंटी, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, जिल्हा नगरविकास नियोजन कक्षाच्या प्रकल्प संचालक ईश्वर उल्लागड्डी, निवडणूक शाखेच्या तहसीलदार सारिका शेट्टी आदी उपस्थित होते.
मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि नोंदणीकृत पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेऊन किंमत निश्चितीबाबत सविस्तर चर्चा करून किंमत निश्चित केली.
0 Comments