बेळगाव / प्रतिनिधी

मराठा सेवा संघ बेळगावच्या वतीने दि. 19 फेब्रुवारी रोजी श्री शिवजयंती निमित्त गंगापुरी मठ, कोरे गल्ली शहापूर येथे भाषण स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत एकूण 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे मराठा सेवा संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, जिजामाता प्रतिमा पूजन तसेच शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. नारायण सावगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत तर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी जाधव होते. तर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शंकरराव बाबलीचे, सेवानिवृत्त एएसआय शिवाजी जाधव, सौ. वैशाली कदम, डॉ. सुरेखा पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून कोल्हापूरच्या जीएसटी विक्रीकर अधिकारी शर्मिला मिस्कीन या उपस्थित होत्या.
या स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम - वैभवी विकास मोरे (बालवीर विद्यालय बेळगुंदी), द्वितीय - पूर्वी रमेश घाडी (मॉडेल हायस्कूल, येळ्ळूर), तृतीय भूमी भातकांडे (बेळगाव) तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक - समृद्धी गणपती पाटील (बालिका आदर्श, टिळकवाडी), द्वितीय- नम्रता लक्ष्मण कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर), तृतीय - प्रतिक्षा पी. अकनोजी (कलमेश्वर हायस्कूल सावगाव) आणि खुल्या गटात प्रथम - वैष्णवी मंगनाईक (आरपीडी कॉलेज), द्वितीय ईश्वर सातेरी पाटील (बेळगाव), तृतीय - विभागून रीना पाखरे (येळ्ळूर) आणि डॉ. कीर्ती बिर्जे (बेळगाव) आदी स्पर्धकांनी बाजी मारली.
यावेळी संध्या शिवाजी पाटील (वडगाव) व निखिल देसाई (तुरमुरी) या दोन नव उद्योजकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी गुंडोजी हावण्णाचे, वृषाली दड्डीकर, रमाकांत कोंडूसकर आदी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. प्रमुख वक्त्या शर्मिला मस्कीन यांनी आपल्या भाषणात नवउद्योजकांसाठी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण धामणेकर, दीपक कोले, नारायण सावगावकर, प्रवीण कदम, बाबू मजुकर, नितीन धामणेकर, प्रशांत धामणेकर, प्रकाश अनगोळकर, मधु मूचंडी आदींनी परिश्रम घेतले. मनोहर घाडी यांनी आभार मानले.