बेळगाव / प्रतिनिधी 

गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 23 रोजी लोकमान्य ग्रंथालयातील बुक लव्हर्स क्लबचा  साप्ताहिक कार्यक्रम सहा वैविध्यपूर्ण कथांच्या सुंदर अभिवाचनानी रंगतदार झाला.मंथन कल्चरल एण्ड वेल्फेअर सोसायटी तर्फे नुकतीच कथा अभिवाचनाची स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत भाग घेतलेल्या बुक लव्हर्स क्लबच्या सदस्यांना तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पुनश्च निमंत्रित करुन बुलकच्या व्यासपीठावरुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शीतल पाटील यांनी स्वलिखित कथा वधू परीक्षा, राही कुलकर्णी यांनी भोकरवाडीतील भुताटकी, किशोर काकडे यांनी अरुणिमा सिन्हा, धनश्री मुचंडी यांनी भूकंप दुबळ्या मनाचा, आरती आपटे यांनी कोल्होबा आजोबा, ऐश्वर्या मुतालिक देसाई यांनी आईचे डोळे या दर्जेदार कथा सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

प्रारंभी सहसचिव संजीव जोशींनी सर्वांचे स्वागत केले व सर्व भाग घेणाऱ्या सदस्यांचे तसेच मंथनचे आभार मानले.सर्व स्पर्धकांनी लोकमान्य ग्रंथालय तसेच बुलकचे आभार मानले.