बेळगाव / प्रतिनिधी
आजच्या तरुणांना जीवनातील अडचणी आणि समस्यांना तोंड देता येत नाही आणि आजची शाळकरी मुले परीक्षेच्या निकालाच्या भीतीने आत्महत्या करतात. जीवनात नेहमी महापुरुषांचे आदर्श आणि तत्वज्ञानाचा अंगीकार करून जीवनाचे महत्त्व जाणून जगले पाहिजे, असे रामकृष्ण आश्रमाचे मंजुनाथ स्वामीजी यांनी सांगितले.
बेळगावच्या किल्ला परिसरातील रामकृष्ण मिशन आश्रमाच्या भावैक्यता मंदिराच्या 19 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार पी.राजीव व अन्य मान्यवर उपस्थित होते. मंजुनाथ स्वामीजी पुढे म्हणाले, मुलांना नैतिक शिक्षण आणि जीवनमूल्य शिकविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाच्या माध्यमातून जीवनातील अडचणी व समस्यांना तोंड देण्याची क्षमता विकसित करून ध्येय गाठण्याच्या मार्गावर पोहोचले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना रामकृष्ण आश्रमाचे सचिव स्वामी आत्मप्राणानंद यांनी, रामकृष्ण मिशन आश्रमाच्या भावैक्य मंदिराच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त 3 ते 5फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.
5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1:30 या वेळेत आध्यात्मिक संमेलन होणार आहे. प्रसिद्ध हिंदुस्थानी संगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचे 6 ते 8 या वेळेत गायन होणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 10 ते 1:30 या वेळेत 700 शिक्षक आणि बीएड महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आज आयोजित कार्यक्रमात सुमारे 700 पदवी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी युवा परिषदेत सहभाग घेतला.
0 Comments