• कुटुंबासह हैद्राबादला जाताना दुर्घटना
  • अग्निवीर सेवेसाठी झाली होती निवड
  • कारधील सर्वजण बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातील 

धारवाड / वार्ताहर 

राष्ट्रीय महामार्ग ४ वर गरगनजीक  गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास  कारची ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातील अवरादी येथील मंजुनाथ महांतेश मुद्दोजी (वय २२) याची अग्निवीर सेवेसाठी निवड झाली आहे. तो युवक हैद्राबादमध्ये कामावर रुजू होणार होता, त्यासाठी तो ट्रेनने धारवाडहून जाणार होता. त्याचे मित्र आणि कुटुंब आनंदी होते. पण कारमधून लष्करी सेवेसाठी कुटुंबासह जाताना हा भीषण अपघात झाला. कारमधील अवरादी गावातील रहिवासी नागप्‍पा इराप्पा मुद्दोजी (वय २९), महांतेश बसप्पा मुद्दोजी (वय ४०), बसवराज शिवपुत्रप्पा नरगुंड  (वय ३५), श्रीकुमार नरगुंड (वय ५ सर्व रा. निच्चनकी) आणि पादचारी इरान्ना गुरुसिद्धप्पा रामनगौडर (वय ३५, मूळचे हेब्बाळी) अशी मृतांची नावे आहेत.

श्रावण कुमार बसवराज नरगुंड (वय ७), मडियावलप्पा राजू आळनावर (वय २२) यांना उपचारासाठी  केआयएमएस मध्ये दाखल केले आहे. प्रकाशगौडा शंकर गौडा पाटील (वय २२) आणि मंजुनाथ महांतेश मुद्दोजी (वय २२) अशी जखमींची नावे आहेत. दोघांनाही धारवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैन्याच्या अग्निपथ भरती शिबिरात सहभागी होणाऱ्या मित्राला निरोप देण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या कारणे आधी ट्रकला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर पुढे चालणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पदाचाराचाही जागीच मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरहून धारवाडच्या दिशेने जात असलेल्या फियाट पुंटोने धारवाड कडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कारचालकाने पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याला धडक दिल्याचीही माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे. या अपघातात पादचारी इरान्ना रामनगौडर यांचाही मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमी व्यक्तींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.