• वैद्य रुपेश साळुंखे यांचा आरोप 
  • चोरट्यांनीविरुद्ध तक्रार दाखल करून योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी
  • बेळगावातील निवासस्थानी घेतली पत्रकार परिषद 

बेळगाव / प्रतिनिधी 

टिळकवाडी  येथील अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये चोरीची घटना घडली आहे. केंद्रातील मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरलेल्या विरुद्ध त्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र पोलीस तक्रारीची दखल घेण्यास नकार देत असल्याचा आरोप करत  चोरट्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेळगाव येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन वैद्य रुपेश साळुंखे यांनी माहिती दिली आहे. ३१ जानेवारी रोजी झालेल्या चोरीच्या घटनेत रुग्णालयाचे कुलूप तोडून मौल्यवान औषधे, वैद्यकीय पुस्तके, रुग्णांच्या नोंदीची फाईल, माझ्या व्यवसायिक जीवनाशी संबंधित अनेक प्रमाणपत्रे, संगणक, सीसीटीव्ही सह लाखो रुपयांच्या महत्त्वाच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत.

चोरट्यांविरुद्ध टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलीस तक्रारीची दखलच घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांचे वर्तन सामाजिक दृष्ट्या अप्रिय असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अंजना अशोक इनामदार  व ऐश्वर्या इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.