• रमाकांत कोंडुसकर यांची माहिती 

 

बेळगाव / प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार विविध प्रकारे अत्याचार करीत आहे.सीमाभातील मराठी माणसाचे भवितव्य अंधाराले आहे.मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर दबाव तंत्र अवलंबले जात आहे.विकासाच्या नावावर लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. बेळगावच्या मराठा लष्कर प्रशिक्षण केंद्रांच्या जवानांचे घोषवाक्य छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे.समस्त हिंदुत्ववादी आणि देशवासी यांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना वगळून रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे.

बेळगावच्या रेल्वे स्थानकावर अन्य थोर राष्ट्रपुरुषांबरोबरच छत्रपती शिवरायांचे भव्य मूर्ती साकारण्यात यावी. या मागणीसाठी,मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि स्वार्थी राजकारणांना हिसका दाखवण्यासाठी, बुधवारपासून सलग पाच दिवस शिवसन्मान पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि श्रीराम सेने हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिली.

यावेळी शिवसन्मान पदयात्रे संदर्भात अधिक माहिती देताना कोंडुसकर म्हणाले,बेळगाव सीमा भाग आणि कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा आणि भगव्याचा ध्वजाचा सातत्याने अवमान केला जात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरीही, बेळगाव सीमा भागातील मराठी भाषकांची परिस्थिती पारतंत्र्यात अडकल्यासारखी आहे. सीमा भागातील मराठी माणसांचा आत्मसन्मान चिरडण्याची एक संधी ही कर्नाटक प्रशासन सोडत नाही. बहुसंख्य मराठी भाषिक शेतकऱ्यांचे प्रश्न जटिल होत चालले आहेत. सरकारच्या आडमुठेपणामुळे तरुणवर्गात निराशा आहे. निराश बनलेले तरुण व्यसनाधीन होत आहेत.अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. त्यांना तुरुंगात डांबण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी विविध प्रकारे संपादित करण्याचे कटकारस्थान सातत्याने सुरू आहे.याला विरोध करण्यासाठी शिवसन्मान पदयात्रा आयोजित केली आहे.

बेळगावच्या ऐतिहासिक राजहंसगडाला राजकारण्यांनी वादाचा मुद्दा बनविला आहे. त्यास राजहंसगडावरून बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पदयात्रेला सुरुवात होणार आहे. राजहंसगडावरील मंदिरात पूजा करून पदयात्रेला सुरुवात होईल. राजहंसगड येथून सुरू झालेली पदयात्रा यरमाळ गाव,अवचारहट्टी,देवगनहट्टी, धामणे व सायंकाळी येळूर येथे वस्ती असेल.

दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारीला सकाळी येळळुर गावातून पदयात्रा पुढे निघेल.सुळगा, देसूर, झाड शहापूर,मच्छे, हूंचनहट्टी,बाळगमट्टी, कुट्टलवाडी मार्गे सायंकाळी पिरवाडी येथे पदयात्रेची वस्ती होईल.

पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी पिरनवाडी येथून पदयात्रा प्रस्थान करेल. ब्रह्मनगर, खादरवाडी, राजाराम नगर,मजगाव, रोहिदास नगर, चन्नमा नगर, पार्वती नगर येथून भवानी नगर येथे सायंकाळी पदयात्रेची वस्ती होईल.

पदयात्रेच्या चौथ्या दिवशी 25 फेब्रुवारीला भवानीनगर येथून पदयात्रा प्रस्थान करेल.टिळकवाडी पापा मळा, शिवाजी कॉलनी, नानावाडी, टिळकवाडी परिसर,अनगोळ,भाग्यनगर मार्गे वडगाव येथे पदयात्रेची वस्ती होईल.

पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी 26 फेब्रुवारीला वडगाव येथून पदयात्रा प्रस्थान करेल. जुने बेळगाव, सोनार गल्ली, नाथ पै चौक, शिवाजी गार्डन, महात्मा फुले रोड, गोवा वेस मार्गे बेळगाव रेल्वे स्टेशनवर पदयात्रेची सांगता होईल. पदयात्रेदरम्यान दररोज प्रवचने आणि समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये होणार आहेत. असेही कोंडुसकर यांनी सांगितले.

सदर पदयात्रा भाषिकांच्या सन्मानासाठी, विकासाच्या नावावर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे षडयंत्र उधळून लावण्यासाठी, स्वार्थी राजकारण्यांना हिसका दाखवण्यासाठी. त्याचबरोबर 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातही पदयात्रेत जनजागृती केली जाणार आहे. या पदयात्रेत प्रत्येक गावातील आणि भागातील त्याचबरोबर सीमा भागातील समस्त हिंदुत्ववादी आणि मराठी भाषिकांनी मिळेल त्या वेळ मिळेल त्याप्रमाणे सहभागी व्हावे.असे आवाहनही कोंडूसकर यांनी केले.

- शिवसन्मान पदयात्रेला तालुका म. ए. समितीचा पाठिंबा -


बेळगाव : छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ तसेच मराठी माणसांची एकजुटीची ताकद दाखवण्याबरोबरच मराठी संस्कृती अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी येत्या 22 ते 26 फेब्रुवारीपर्यंत आयोजीत शिव सन्मान पदयात्रेला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे.

शिवसन्मान पदयात्रेसंदर्भात सदर यात्रेचे नेतृत्व करणारे समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज मंगळवारी बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांची भेट घेतली.यावेळी माजी आमदार किणेकर यांनी शिवसन्मान पदयात्रेला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. मुंबईत येत्या 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धरणे आंदोलनाची जनजागृती या शिव सन्मान यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे कोंडूसकर यांनी यावेळी नमूद केलं. याप्रसंगी समितीचे सुरेश राजुकर,संजय पाटील,पुंडलिक पावशे,सुहास चौगुले,अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.