• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही  

मुंबई  / प्रतिनिधी  

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार पुरेपूर खबरदारी घेत आहे. त्याचबरोबर बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आणि सीमा समन्वयक शंभूराज देसाई तसेच राज्यसचिव राकेश कुमार यांची मध्यवर्तीच्या शिष्टमंडळा समवेत बैठक झाली. बैठकी प्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना किणेकर म्हणाले, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक अवस्थेत आहे. अशावेळी वेगवेगळ्या कारणास्तव सुनावणी लांबणीवर पडत आहे. याबाबत गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.  न्यायालयीन कामकाजा संदर्भात प्रत्येक महिन्याला सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक होणे आवश्यक आहे. सीमाप्रश्नी स्थापन केलेल्या मंत्रालयातील सीमा कक्षात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दीर्घकालीन सेवेसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. सीमा वासिया जनतेला महाराष्ट्राकडून खूप आशा आहे. मात्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव सीमा भागात येण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात योग्य ती आक्रमक भूमिका घ्यावी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यांना सहा जणांची समिती स्थापन करण्याबाबत सूचना केली आहे. त्याचीही लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. कर्नाटक सरकारकडून विविध प्रकारे आणि सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे, सीमा वासियांच्या आग्रहास्तव २७ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण व मंत्र्यांनी उपस्थित राहून सीमा वासियांना मार्गदर्शन करावे अशी विनंती किणेकर यांनी केली.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयातील कामकाजा संदर्भात वकिलांशी सातत्याने चर्चा केली जात आहे. न्यायालयीन कामकाजात कुठेही कमतरता भासू नये, याबाबत दक्षता घेतली जात आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाव सीमा भागात येण्यासाठी गाण्यात आलेल्या बंदी बाबत आपण गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. सीमा भागातील जनतेला महात्मा फुले योजनेअंतर्गत बेळगाव येथील केवळ दोनच रुग्णालयात उपचार केले जात होते. पुढील काळात अन्य रुग्णालयातही  ही सुविधा प्राप्त व्हावी, यासाठी ही लवकरच प्रयत्न केले जातील.    सीमाभागातील मराठी जनतेच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, ॲड. एम.जी. पाटील, विकास कलघटगी  आदि उपस्थित होते.