• काम करत असलेल्या दुकानातच चोरी
  • संशयिताची हिंडलगा कारागृहात रवानगी

बेळगाव / प्रतिनिधी  

हुक्केरी शहरातील एका नामांकित  सोन्याच्या दुकानात डिसेंबर २०२२ मध्ये चोरी झाली होती. त्या चोरी प्रकरणातील संशयितला गजाआड करण्यात आले होते. शुक्रवार (दि. २४) रोजी ओकेरी पोलिसांनी त्या प्रकरणातील सोने  जप्त केले असून त्याची किंमत ३६ लाख ८१ हजार इतकी आहे. याबाबत  जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  दिलेल्या माहितीनुसार, हुक्केरी येथील प्रसिद्ध सराफी दुकानात ६४३ ग्रॅम सोने चोरीला गेल्याची फिर्याद हुक्केरी पोलीस स्थानकात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.

याप्रकरणी दुकानात काम करणाऱ्या सेल्समनला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून  त्याच दिवशी म्हणजे २ जानेवारी २०२३ रोजी १२१ ग्रॅम सोने जप्त केले होते. या चोरी प्रकरणातील आणखी सोनी व ऐवज शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू होता.  त्यानुसार पोलिसांना उर्वरित ५२२ ग्रॅम सोने जप्त करण्यात यश आले. पोलिसांनी संशयित म्हणून पाळत ठेवून सेल्समनला ताब्यात घेतल्यानंतर या चोरी प्रकरणाचा उलगडा झाला होता. मात्र आणखी उर्वरित सोने जप्त करण्यासाठी पोलिसांनी तपास करून सर्व सोने जप्त केले आहे.

गोकाकचे विभागीय पोलीस उपाधीक्षक दादापीर मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक एम.एम. तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन टप्प्यात ही कारवाई केली. यापूर्वीच संशयताला न्यायालयीन कोठडी घेतली होती. त्यातच शुक्रवारी इतर सोने जप्त करण्यात यश आल्याने या चोरी प्रकरणाची माहिती समोर आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक एम. एम. तहसीलदार, सहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. सनदी, सी. डी.पाटील, लक्ष्मण कोचरी, मंजुनाथ कब्बूूर, गजानन कांबळे, सिद्धू रामदुर्ग, अजित नाईक, सावित्री अंगरेट्टी आदींनी सहभाग घेतला. कारवाईत सहभागी पोलीस पथकाचे  जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी कौतुक केले आहे.