बेळगाव / प्रतिनिधी
आज शुक्रवारी अनगोळ कन्नड सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक १८ येथे आज सकाळच्या सुमारास पाच वर्षीय शिवमवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात शिवम च्या डोक्यात आणि पाठीला जखमा झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक गुंजटकर यांनी जखमी शिवमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात विचारासाठी दाखल केले आहे.
-आचार्य गल्ली शहापूर येथे भटक्या कुत्र्याचा बालिकेवर हल्ला-
दरम्यान ही घटना ताजी असतानाच आचार्य गल्ली शहापूर येथे भटक्या कुत्र्याने बालिकेवर हल्ला करून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ती बालिका गंभीर जखमी झाली आहे. रिद्धी कपिल माळवी (वय ४) असे जखमी बालिकेचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहापूर आचार्य गल्ली येथील रहिवासी कपिल माळवी यांची पत्नी आज सकाळी ९ वा. सुमारास मुलगी रिद्धी हिला घरासमोरील पायरीवर बसवून बाजूलाच कपडे धुवत होती. कपडे धुतानाच काही कामानिमित्त त्या घरात गेल्या असता भटक्या कुत्र्याने पायरीवर बसलेल्या रिद्धीवर हल्ला करून चावा घेण्याबरोबरच तिला फरफटत येण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिद्धीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आई आणि परिसरातील नागरिकांनी त्या कुत्र्याला हुसकावून लावले आणि त्याच्या तावडीतून रिद्धीची सुटका केली.
या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक रवी साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी रिद्धीला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात रिद्धीच्या तोंडाच्या जबड्याला, हाताला आणि कंबरेला जखमा झाल्या आहेत.
कुत्र्यांच्या दहशतीमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. अशाप्रकारे शहरात आज एकाच दिवशी दोन ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी होण्याच्या घटना घडल्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
या हल्ल्यामुळे शहरातील भटकी कुत्री फक्त उपद्रवीच नव्हे तर आता जीवघेणी धोकादायक ठरत असल्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई करावी अशी अशी मागणी होत आहे.
0 Comments