- महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांचे गौरवोउद्गार
- दि बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को.-ऑप. क्रेडिट सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी
सहकार चळवळीत अनेक संस्था येतात ; संपतात मात्र काही ठराविक संस्थाचं टिकतात त्याचप्रमाणे दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को.ऑप.सोसायटी बेळगाव या पतसंस्थेनेही स्पर्धेत टिकून राहताना यशाच्या शिखरावर वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे असे गौरवोउद्गार महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी काढले. रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी शहरातील रेल्वे ओव्हरब्रीज नजीकच्या मराठा मंदिर मध्ये सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर, संस्थेचे चेअरमन रमेश मोदगेकर, व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील, प्रा. आनंद मेणसे, प्रा. दत्ता पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी सोसायटीच्या प्रगतीचा उल्लेख करताना आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले, दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को.ऑप.सोसायटी बेळगावची स्थापना १९७० साली झाली आणि आजपर्यंतच्या ५० वर्षांच्या प्रवासामध्ये लहान स्वरूपात केलेली सुरुवात आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे. प्रामाणिक निष्ठावंत आणि सहकार क्षेत्रावर विश्वास ठेवून काम करणाऱ्यांमुळेच संस्था टिकते आणि वाढते. संस्थापक चेअरमन तात्या तशिलदार, वसंतराव परुळेकर, अनंतराव पावशे यांच्यासह अनेकांनी ही संस्था सुरू करताना पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा संस्थेचे १०५ सभासद होते. आज त्याच संस्थेचे २८२८ सभासद झाले आहेत. भाग भांडवल १३,०७० रु. होते ते आज १ कोटी ६८ लाख रु. झाले आहे. खेळते भांडवल २९,००० रु. होते ते आज ६० कोटी ९२ लाख रु. झाले असून संस्थेला आज ४६ कोटी ९५ लाखांच्या ठेवीपर्यंत पोहोचण्याचे श्रेय मिळाले आहे. सर्वांचे सत्कार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या पतसंस्थेत कोणी धनिक, कुठलाही फार मोठा उद्योगपती, उद्योजक, फार मोठे व्यक्ती कोणीही व्यासपीठावर आले नाहीत.तर सेल्फ मेड स्वतःच्या कर्तबगारीवर आयुष्यात प्रगती केलेले, स्वतःचे व्यवसाय आणि उद्योग सांभाळून या सहकार चळवळीला आधार दिलेले विविध मान्यवर व्यासपीठावर आले. हे सर्व सत्कारमूर्ती संस्थेच्या विश्वासाचा आणि सहकार्याचा भक्कम पाया आहेत. त्यामुळे ही संस्था दिवसेंदिवस मोठी होणार आहे. सहकार क्षेत्रात आता नवनवीन आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे चेअरमन रमेश मोदगेकर, व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील आणि त्यांचे संचालक मंडळ नवनवीन आव्हानांना ओळखून स्वतःमध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करतील आणि पुढची पावले टाकतील अशी मला खात्री आहे. या सहकार चळवळीत बरेच तरुण या संस्थेत सहभागी आहेत. शेवटी आपली ही धुरा हळूहळू तरुण नव्या चेहऱ्यांकडे सोपविण्याचे काम वेळेत केले तर ती सहकार चळवळ टिकते आणि वाढते. तेही काम संस्थेकडून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे या संस्थेत ५० वर्षांपासून सभासद , कर्मचारी आहेत त्यांचा सन्मान आपण सर्वांनी केलात हे अभिमानास्पद असून जुन्या गोष्टी न विसरता संस्था पुढे जात असेल तर या संस्थेची गोडी अनेकांना लागेल असा मला विश्वास आहे असेही ते म्हणाले. आजच्या बदलत्या काळात आधुनिक स्वरूपात बँकेचे सर्व व्यवहार मोबाईलद्वारेच होतील याची मला खात्री आहे. पतसंस्थेच्या संचालकांसह पदाधिकारी आणि कर्मचारी नवीन तंत्रज्ञान लवकरात लवकर आत्मसात करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याचबरोबर मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी मराठी भाषिकांच्या मुंबईत होणाऱ्या 'चलो मुंबई मोर्चाला' ही त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना महाराष्ट्र सरकारचे वकील न्यायालयात योग्य बाजू मांडतील असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. दि बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल, को. ऑप. सोसायटी सारख्या मराठी माणसांनी एकत्र येऊन चालू केलेल्या या संस्थेच्या सोहळ्यात सहभागी होता आले याबद्दल त्यांनी संस्थाचालकांचे आभार मानले.
"सुवर्णाध्याय" स्मरणिकेचे प्रकाशन
प्रारंभी सृष्टी देसाई हिने स्वागतगीत सादर केले. तर व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना सोसायटीच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा आढावा घेतला. यानंतर आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्याचप्रमाणे चेअरमन रमेश मोदगेकर आणि व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील यांच्या हस्ते आमदार जयंतराव पाटील, निवृत्त पणन संचालक व अतिरिक्त आयुक्त (सहकार) महाराष्ट्र राज्य दिनेश ओऊळकर, प्रा. आनंद मेणसे, प्रा. दत्ता पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते "सुवर्णध्याय" स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. आनंद मेणसे यांनी सन १९७० साली स्थापन झालेल्या संस्थेच्या छोट्या रोपट्याचा विस्तार कसा झाला याचे यथार्थ वर्णन केले.
यावेळी ते म्हणाले, शहरातील जुन्या पुणे - बेंगळूर रोडवर त्यावेळी मोटार बॉडी बिल्डिंग व त्याला पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता. श्री शिवजयंती उत्सव बेळगावचे पूर्वीपासून मोठे आकर्षण आहे. जिजामाता चौकातील शिवाजी कंपाउंड मध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने त्याकाळी काही व्यावसायिक एकत्र आले. याच सुमारास तत्कालीन कर्नाटक राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात सहकारी तत्त्वावर औद्योगिक पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या व्यवसायिकांनी आपली पतसंस्था स्थापन करून व्यवसाय वृद्धिंगत करत जनतेपुढे आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले निवृत्त पणन संचालक व अतिरिक्त आयुक्त (सहकार) महाराष्ट्र राज्य, दिनेश ओऊळकर यांनी सहकार चळवळीची माहिती देताना सविस्तर मार्गदर्शन केले.
तर प्रा. दत्ता पाटील यांनी निरपेक्ष भावनेने सहकार्याचा विचार घेऊन पुढे गेल्यास सहकारपणा वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली. सभासदांच्या संस्थेवर असलेल्या विश्वासावरच सहकारी संस्था चालतात. विश्वास हीच संस्थेची खरी ठेव असते. जोपर्यंत सभासदांची संस्थेवर विश्वासार्हता नसते तोपर्यंत सहकारी संस्थेची तोपर्यंत संस्थेची प्रगती होत नाही असेही ते म्हणाले.त्याचप्रमाणे सहकारी संस्थेत राजकारण गटबाजी आणि लॉबिंग आल्यास संस्था लवकरच बंद पडतील, सहकार हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. भांडवलशाहीला पर्याय म्हणून सहकारी संस्था महत्त्वाच्या आहेत. तेव्हा सहकारी संस्थांनी काळाची गरज ओळखून कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात संस्था लोकाभिमुख मार्गाने कशी काम करेल याचा पाठपुरावा करणे ही संचालक मंडळाची जबाबदारी आहे. एकमेका सहाय्य करू, विना सहकार नाही उद्धार हे सहकाराचे घोषवाक्य असून एकमेकांना सहकार्य करण्याची भावना असली पाहिजे असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षित आणि जागृत सभासदांची संख्या वाढत असून पारदर्शी कारभार करणाऱ्या संस्था असणे ही ठेवीदारांची गरज असल्याचे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. सभासद व ठेवीदारांच्या सहकार्यानेच सहकारी संस्था कार्यरत असतात त्यामुळेच सहकारातून समृद्धी कशी शक्य आहे हे त्यांनी पटवून दिले.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन रमेश मोदगेकर यांनी ३१ जानेवारी २०२३ अखेरीस सोसायटीची सभासद संख्या, भाग भांडवल, राखीव व इतर निधी, ठेवी , खेळते भांडवल याबाबतची माहिती दिली. तसेच संस्थेची स्थापना झाल्यापासून या ५० वर्षांच्या वाटचालीत पतसंस्थेच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्यांचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. वाय.पाटील यांनी केले. तर आभार के. सी. मोदगेकर यांनी मानले. कार्यक्रमा दरम्यान माजी मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते संस्थेचे आजी माजी सभासद, संचालक व कर्मचारीवर्गांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी - माजी कर्मचारी, ठेवीदार, हितचिंतक, सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर आदि उपस्थित होते.
'महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठीशी'
सीमा लढा यशस्वी व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजे आणि सीमा भागातील जनतेवरील अत्याचार दूर व्हावा ही महाराष्ट्र सरकारची आग्रही भूमिका आहे. सीमाप्रश्नी गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. तेव्हा आमदार कोणताही असो लोक भावनेला महत्त्व आहे, असेही माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले.
0 Comments