• हिंडलगा कुष्ठरोग मिशन हॉस्पिटलच्या प्रांगणात जनजागृती मोहीम

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

कुष्ठरोगामुळे होणाऱ्या अपंगत्वामुळे थेट बाधित झालेल्या लोकांना योग्य ती माहिती देण्यात यावी. कुष्ठरोग निर्मूलनासाठी बाधित रुग्णांमध्ये भेदभाव न करता आपण सर्वांनी मिळून त्यांना बरे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुष्ठरोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध घेऊन उपचार केल्यास अपंगत्व टाळता येते असे डॉ. सुरेश वर्गीस यांनी सांगितले, हिंडलगा येथील कुष्ठरोग रुग्णालयाच्या  प्रांगणात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, कुष्ठरोग नियंत्रण विभाग आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बेळगाव, ग्रामपंचायत हिंडलगा, कुष्ठरोग मिशन हॉस्पिटल हिंडलगा व प्राथमिक आरोग्य केंद्र बेळगुंदी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाव्यापी कुष्ठरोग जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

कुष्ठरोग हा लेपरी नावाच्या सूक्ष्मजीवांमुळे पसरणारा आजार आहे. सर्वसामान्य जनतेने व विशेषतः तरुणांना कुष्ठरोगाबद्दल जागरूक केले पाहिजे. कुष्ठरोग झाल्याचे आढळले अस तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार सुरू करावे, असे डॉ. चांदनी देवडी यांनी  सांगितले. कुष्ठरोगाबाबत जनजागृती करणे, कुष्ठरोगाबाबत होत असलेल्या भेदभावाबद्दल आणि मानसिक आरोग्याबाबत सखोल समुपदेशन करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनी अंगणवाडी, आशा सेविका व इतर अधिकारी उपस्थित होते.