• ५ लाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला

बेळगाव / प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपूर्वी नेहरूनगर मच्छे त्यानंतर पिरनवाडी येथील घरफोडीची घटना ताजी असतानाच  आज चोरट्यांनी बेळगाव शहराच्या आझाद गल्लीतील एक बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील पाच लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविला.

हरचंद प्रजापत  हे व्यापारी असून आझाद गल्ली बेळगाव येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात. त्यांच्या घरावर चोरट्यांनी आज भरदिवसा  डल्ला मारला. प्रजापती आपल्या दुकानात गेले होते. तर त्यांच्या पत्नी बाजारहाट करण्याच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील तिजोरीचे कुलूप उचकटून  त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकंदर साडेचार ते पाच  लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला.

प्रचंड प्रजापत यांच्या पत्नी बाजारातून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले यामुळे त्यांना धक्काच बसला. ही बाब त्यांनी आपल्या पतीला कळविली. पती हरचंद यांनी मार्केट पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

चोरट्यांनी बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात ठिकठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या दोन दिवसात नेहरूनगर, मच्छे आणि पिरनवाडी येथे चोरी केल्यानंतर  आज दिवसाढवळ्या आझाद गल्ली येथील घराला चोरट्यांनी लक्ष्य बनवले. एकंदरीत चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पोलिसांकडे होत आहे.