विजयपूर / वार्ताहर 

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी चोरट्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. यावेळी चोरट्याने चाकूचा धाक दाखवत कार घटनास्थळी सोडून पलायन केले. विजयपूर शहरातील बेंगळूर-सोलापूर मार्गावर असलेल्या टोलनाक्यावर रविवारी सकाळी विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, (केए -०१ एमसी - ०९७३) क्रमांकाची सेंट्रो कंपनीची कार  इलकल (ता. बागलकोट) येथून चोरीस गेली होती. कार चोरल्यानंतर संबंधित चोरटा सोलापूरच्या दिशेने निघाला होता. याबाबत इलकल पोलिसांनी विजयपूर टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांना कार चोरीला गेल्याचे कळविले होते. इलकल पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळच्या सुमारास सोलापूर कडे निघालेली ही कार चौकशीसाठी थांबविण्याची सूचना केली. मात्र संबंधित चोरट्याने कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखविला आणि कार घटनास्थळी सोडून पोबारा केला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सुमारे ४ कि.मी. अंतरापर्यंत चोरट्याचा पाठलाग केला. मात्र पळून जाण्यात चोरटा यशस्वी झाला.

सदर कारमध्ये चोरीची बॅग,चाकू आणि कात्री सापडली. बॅगेत चोरीचे सोने-चांदी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोराची बॅग इलकल पोलिसांनी जप्त केली आहे. कार क्र. केए -०१ एमसी - ०९७३ ही अनासरी यांच्या नावावर आहे. या घटनेची नोंद विजयपूर पोलीस स्थानकात झाली असून विजयपूर ग्रामीण पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.