- शहरातील हुतात्मा चौकात पार पडला कार्यक्रम
- संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दणाणला परिसर
- बेळगावसह सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील मराठी बांधवांतर्फे १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या महादेव बारगडी, मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, कमळाबाई मोहिते यांना आज मंगळवारी १७ जानेवारी रोजी सकाळी शहरातील हुतात्मा चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी डोक्यावर हुतात्मा दिना संदर्भातील मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान केलेले पुरुष व महिला कार्यकर्ते लक्षवेधी ठरले.
प्रास्ताविकात माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर मनोगत व्यक्त करताना दीपक दळवी यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १९५६ साली हुतात्मा झालेल्या मधु बांदेकर, महादेव बारगडी, लक्ष्मण गावडे, मारुती बेन्नाळकर, कमळाबाई मोहिते यांच्यासह सीमावासियांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. गेल्या ६५ वर्षांपासून सुरू असलेल्या सीमालढ्याची धार अजूनही तीव्र आहे. सद्यस्थितीत युवा पिढीमधील मराठी भाषेचा स्वाभिमान आणि सीमाप्रश्नाबद्दल असलेली आत्मीयता लक्षात घेता भविष्यात लढ्याची धार अधिक तीव्र होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्रद्धांजली कार्यक्रम झाल्यानंतर बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, बेळगाव - कारवार निपाणी - बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासह हुतात्म्यांच्या स्मरणार्थ घोषणा देत शहरातील रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली,अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड या मार्गांवरून फेरी काढण्यात आली. या फेरीत सीमा भागातील मराठी भाषिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
0 Comments