बेळगाव / प्रतिनिधी  

बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या रक्तात राष्ट्रप्रेम ठासून भरले आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाचे  प्रतीक असून देशभक्तीचे हे संचित घेऊन एकसंघ, श्रेष्ठ भारत बनविण्याचा संकल्प आज करूया असे आवाहन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर स्वतंत्र भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनात ध्वजारोहण केल्यानंतर मंत्री गोविंद कारजोळ बोलत होते.

बेळगाव ही स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या वीरांची भूमी आहे. म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान पुरुषांचा पदस्पर्श लाभलेली ही पुण्यभूमी आहे. इथे विविध भाषा आणि संस्कृतीचे लोक सामंजस्याने राहतात हे येथील वैशिष्ट्य असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जिल्ह्यातील ५.५९ लाख शेतकऱ्यांना १११.१७ कोटींचा थेट लाभ मिळवून देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेतून जिल्ह्यात २३६ घटकांना बँकेतून अर्थसहाय्य मिळवून देऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही संपूर्ण राज्यात मोठी संख्या असल्याचे सांगून पालकमंत्री कारजोळ यांनी जिल्ह्याच्या प्रगतीचाही यावेळी आढावा घेतला.

प्रारंभी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर केएसआरपी, डीएसआर, सिव्हिल महिला सिव्हिल पोलीस, होमगार्ड्स, एक्साईज, एनसीसी छात्र, भारत सेवा दलाचे अगसगे हायस्कूल, महिला विद्यालय, मोरारजी देसाई निवासी शाळा, मराठा मंडळ, सिद्धरामेश्वर इंग्लिश हायस्कूल, वनिता विद्यालय, शेख सेंट्रल स्कूल, माहेश्वरी अंधशाळेचे विद्यार्थी आदींच्या वीज तुकड्याने शानदार पथसंचलन करून कारजोळ  यांना मानवंदना दिली. संचलनाचे निरीक्षण करून त्यांनी ही मानवंदना स्वीकारली.

यावेळी प्रादेशिक आयुक्त  एम. जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. साईओ दर्शन एच. व्ही. शहर पोलीस आयुक्त  डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख  डॉ. संजीव पाटील यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.