सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळगा (हिं.) गावात शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित, ब्रह्मलिंग हायस्कूलच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम आज पार पडला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह, सुळगा (हिं.) ग्रा. पं. अध्यक्षा निर्मला कलखांबकर आणि उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले. तर शेतकरी शिक्षण सेवा समितीचे उपाध्यक्ष भाऊराव गडकरी यांनी श्रीफळ वाढविले. 




याप्रसंगी युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी शिक्षण सेवा समितीचे अध्यक्ष देवाप्पा ठाणू पाटील यांच्यासह सर्व सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 


यानंतर ब्रह्मलिंग हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना आरोग्य, शिक्षण, पाणीव्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून मतदार संघातील विविध गावांमध्ये शाळांच्या २८० खोल्यांच्या बांधकामासाठी भरीव निधी दिला आहे. राजकारण बाजूला ठेवून मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.



यापुढेही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन मतदारसंघाचा 'न - भूतो ; न -भविष्यती' असा विकास करण्याचे ध्येय असून हनुमाननगर प्रमाणेच  सुळगा (हिं.) गावाचा कायापालट करण्याची ग्वाही आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी  दिली. त्याचप्रमाणे येत्या ९० दिवसात निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. तेव्हा जनतेकडून मिळत असलेले प्रेम, प्रोत्साहन, आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू दे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेतकरी शिक्षण सेवा समितीचे उपाध्यक्ष भाऊराव गडकरी यांनीही विचार मांडले.


प्रारंभी व्ही. सी. अनगोळकर टीचर यांच्याहस्ते आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे, टी. डी. गवई टीचर यांच्याहस्ते ग्रामपंचायत अध्यक्षा निर्मला कलखांबकर यांचे तर भाऊराव गडकरी यांच्याहस्ते युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांचे शाल , पुष्पहार आणि पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले.



यावेळी व्यासपीठावर शेतकरी शिक्षण सेवा समितीचे अध्यक्ष देवाप्पा ठाणू पाटील, उपाध्यक्ष भाऊराव गडकरी, सेक्रेटरी बी. डी. पाटील, सदस्य अशोक चंद्रू पाटील, कृष्णा ओम्माण्णा पाटील, प्रकाश महादेव पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा निर्मला कलखांबकर, ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा कालखांबकर, भागाण्णा नरोटी, मल्लाप्पा उचगावकर, शट्टूप्पा पाटील, वर्षा सांगावकर, राजश्री कोलकार, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. ए. घुगवाड यांनी तर सूत्रसंचालन एस. ए. झेंडे  यांनी केले. आभार मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला ब्रह्मलिंग हायस्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी, माजी मुख्याध्यापक आर. एन. हुलजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.